| ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात एसआरए लागूकराः आमदार किणीकर यांची मागणी

 अंबरनाथः मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) लागू करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई महानगर क्षेत्र हे उद्योग धंदा व रोजगार यासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याने मोठ्या प्रमाणात लोक रोजगाराच्या निमित्ताने या भागात येत असतात. मुंबई - ठाणे - नवी मुंबई या महानगरांमध्ये राहण्याची सोय आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने लोकांची अंबरनाथ, बदलापूर, वसई विरार अशा नगरपालिका क्षेत्रांत राहण्यासाठी ओढ असते. त्यामुळे या नगरपालिका क्षेत्रामध्येही झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या झोपडपट्ट्यांमुळे या शहरातील सुविधांवर ताण पडत आहे. नगरपालिका क्षेत्रातील वाढती झोपडपट्टी पाहता याभागात झोपडपट्टीवासीयांनाही चांगले जीवनमान प्राप्त व्हावे यासाठी मुंबई सारखे झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणे आवश्यक आहे. या पार्शवभमीवर ही मागणी करण्यात आली असल्याचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यानी  सांगितले।